Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानने (Sai Baba Mandir) मोफत जेवण थांबवून हे पैसे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, शिक्षणासाठी वापरावेत, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
शिर्डी : शिर्डीतील साईबाबा संस्थानने (Sai Baba Mandir) मोफत जेवण बंद करावे आणि हा निधी मुलांच्या शिक्षण व भवितव्यासाठी वापरावा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला आहे. शिर्डीतील (Shirdi News) साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक लोकांना मोफत भोजन देते. मात्र, यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगत, मोफत जेवण बंद करून हा निधी मुलांच्या भविष्यासाठी वापरण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही
आम्हाला आंदोलन करावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा सुजय विखेंनी साई संस्थानला दिला आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. मात्र, तिथे योग्य दर्जाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. इंग्रजी विषय शिकवणारा शिक्षक मराठीतून इंग्रजी शिकवत असेल, तर त्याचा काय उपयोग? असे म्हणत सुजय विखेंनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर टीका केली आहे. शिर्डीतील शिर्डी परिक्रमा उद्धोषणा कार्यक्रमात सुजय विखे पाटलांनी भोजनालयात शुल्क आकारण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय झाला नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वेळीच सुजय विखे पाटलांनी माफी मागावी – अक्षयमहाराज भोसले
शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही समस्या असल्यास, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चितच मदत करतील. मात्र, आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप बंद करावे, तसेच त्यांना भिकारी असे संबोधणे दुर्दैवी आहे. अन्नदानाच्या प्रसादात सर्वसामान्य भाविकही सहभागी होतात. असे म्हणत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भूतकाळात शिर्डीमध्ये साईबाबांना कोणीही मदतीचा पळीभर तेल दिला नव्हता. आता पुन्हा तशीच नकारात्मक भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी सुजय विखे पाटलांनी वेळीच माफी मागावी.